मित्र पक्षांच्या मागण्यांबाबत जुळवून घेण्याची वेळ

मुंबई : भाजपच्या विरोधात मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाडय़ांवर काँग्रेसने भर दिला असला तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि कर्नाटकात देवेगौडा यांच्या जनता दलाने काँग्रेसला जागांच्या संख्येवरून चांगलेच तंगविले आहे. मित्र पक्षांच्या मागण्यांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला जुळवून घ्यावे लागत आहे.

राज्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडीसाठी काँग्रेसची गेली तीन महिने चर्चा सुरू आहे. पण अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर जागावाटप जाहीर करू, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले असले तरी अद्यापही उभयतांमध्ये तोडगा निघू शकलेला नाही. कर्नाटकात जनता दलाने काँग्रेसची पूर्ण कोंडी केली आहे. काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर दावा केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जनता दल (से)चे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ हे सूत्र आधी निश्चित झाले होते. गेल्या वेळी ऐनवेळी राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा काँग्रेसकडे सोपविली होती. यंदा मात्र राष्ट्रवादीने निम्या जागांची मागणी केली होती. भाजप आणि शिवसेना युतीत २६-२२ चे सूत्र ठरलेले होते. या वेळी भाजपने एक पाऊल मागे टाकत शिवसेनेला एक जागा अतिरिक्त दिली आहे. परिणामी भाजप २५ तर शिवसेना २३ असे जागावाटप निश्चित झाले. यामुळे राष्ट्रवादीलाही काँग्रेसकडून अधिक जागा हव्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत २५ -२३ जागांचे वाटप होण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने नगरच्या जागेवर काँग्रेस अडून बसला आहे. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली.

मित्र पक्षांना उभयतांनी किती जागा सोडायच्या हा मुद्दाही अद्याप अनिर्णित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून, पुढील आठवडय़ात तोडगा निघेल, असे सांगण्यात आले.

कर्नाटकात ‘जद’ची हाव वाढली

कर्नाटकात जनता दल १० जागांवर अडून बसला आहे. वास्तविक गेल्या वेळी जनता दलाचे फक्त दोनच खासदार निवडून आले होते. भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून काँग्रेसने जनता दलाला मुख्यमंत्रीपद दिले. आता जनता दल काँग्रेसकडून पुरेपूर किंमत वसूल करीत आहे. काँग्रेस सहा जागांपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. त्यातच जनता दलाने काँग्रेसचे खासदार असलेल्या दोन मतदारसंघांवर दावा केला आहे. याशिवाय पक्षाची फारशी ताकद नसलेल्या मतदारसंघांची मागणी केली आहे. देवेगौडा आणि राहुल गांधी यांच्यातील चर्चेनंतर रविवापर्यंत तोडगा निघेल, अशी शक्यता आहे.