उद्धाटनाचा कार्यक्रम म्हटला की राजकीय नेत्यांची उपस्थिती तसंच सत्कार सोहळा यासाठी लगबग असते. राजकीय नेत्यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यासाठी गावच्या ठिकाणी अनेकजण प्रयत्न करतात. दरम्यान अशाच एका कार्यक्रमात एका लहान मुलाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मी नारळ फोडू का? अशी विचारणा केली. यानंतर जयंत पाटील यांनीदेखील नारळ फोडून शुभारंभ करण्याची त्याची इच्छा पूर्ण केली. आपल्या या कृतीने जयंत पाटील यांनी उपस्थित गावकऱ्यांची मनं जिंकली.

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले होते.

वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना सहा वर्षीय संचित गावडेही तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून संचितलाही याचं कुतूहल वाटलं. मोठी हिंमत करुन संचितने जयंत पाटील यांच्याकडे नारळ फोडण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयंत पाटील यांनीही त्याला नारळ फोडून देत इच्छा पूर्ण केली.