मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. उद्धव ठाकरे आमदार म्हणून निवडून आल्याने राज्य सरकारसमोरील संकट अखेर संपलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदरकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. उद्धव ठाकरे यांच्यासहित इतर आठ जणही बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं असून छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंची बिनविरोध निवड झाल्याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. “आमदार म्हणून विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत अभिनंदन ! छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली याबाबत आनंद होतोय. महाराष्ट्र सरकार रयतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार याचा मला विश्वास आहे,” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती.

करोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.