भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका करताना त्यांनी एकतर राजधानी पुण्यात हलवून इथून कामकाज करावं किंवा पुण्याचे पालकमंत्री तरी बदलावेत, अशी टीका केली होती. दरम्यान जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या कामाचं कौतुक करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

“अजित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम अजित पवार करत आहेत. पुण्यावरही अजित पवारांचं लक्ष आहे. काही प्रश्न निर्माण झाला तर अजित पवार उपलब्ध असतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. अजित पवारांनी पुण्यात येऊन अनेकदा बैठक घेतली आहे. पिंपरीत जाऊन पाहणीही केली आहे. काहीतरी बोलायचं म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

“कुणीतरी काहीतरी सांगावं आणि मी…”, चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्यावर अजित पवारांची कोपरखळी!

“अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनाच त्यांच्या पक्षाचे किती लोक भेटले त्यांना माहिती नसल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापुरचे असून पुण्यात येऊन उभे राहिलेत. पुण्यातल्या लोकांनी निवडून दिल्याने पुण्यातल्या लोकांसाठी काहीतरी करत असल्याचं सांगण्याचा ते प्रयत्न करत असतील आणि त्याच्यासाठी अजित पवारांवर टीका करत असतील तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

“अजित पवार किती झपाट्याने, वेगाने आणि कशा पद्दतीने काम करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. “स्थानिक सरकार जनतेच्या बाजूने उभं राहून लसची, रेमडेसिवीरची मागणी करत असेल तर त्याच्यात श्रेयवाद नाही,” असं सांगत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं.