राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानावर ईडीने छापे टाकले असून कारवाई सुरु आहे. शुक्रवारी सकाळी ईडीच्या एका पथकाने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. दरम्यान दुसरीकडे एका पथकाने मुंबईतील वरळीमधील सुखदा इमारतीतील निवासस्थानावर छापा टाकला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुखांच्या मुंबईतील घरावरही ईडीचा छापा; झाडाझडती सुरु

“अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काही सापडत नाही म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. १० वर्षांपूर्वीचं प्रकरणं बाहेर काढून त्यावरुन एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची याचाच अनुभव सर्वांना येत आहे. मोठे आकडे टाकून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ही पद्दत आहे,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी, “ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर यात किती तथ्य असावं याचं उत्तर मिळतं,” असंही म्हटलं आहे.

अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा – संजय राऊत

नागपुरातील निवासस्थानी छापा

शुक्रवारी सकाळी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

यंत्रणेचा गैरवापर हे भाजपाचं ‘स्टाईल ऑफ ऑपरेशन’ दिसत आहे – सुप्रिया सुळे

“यंत्रणेचा गैरवापर हे भाजपाचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. मागील अनेक वर्षात त्यांची सत्ता आल्यापासून आम्ही जवळूवन पाहिलेलं आहे. शरद पवारांना देखील ईडीची नोटीस पाठवली गेली होती, त्यामुळे हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे,” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हटलं आहे.

“राजकारण हे विचारांचं असतं, लोकांच्या सेवेसाठी असतं. मी आजपर्यंत या देशात यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांच्या विरोधात केलेला पाहिलेला नाही. एक गोष्ट जबाबदारीने सांगू इच्छिते की, महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीही सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला गेला नाही. नेहमी विचारांचं राजकारण झालं आहे. जे काही विरोध होतात, मतभेद होते ते वैचारिक होते. यामध्ये यंत्रणांचा वापर मी तरी कधी पाहिलेला नाही. ही नवीन एसओपी ज्याला ऑपरेटिंग स्टाईल म्हणतात ती त्यांनी काढलेली आहे, ठीक आहे लढूयात. जाणूनबुजून केलं जात आहे असं देखील दिसत आहे.”