कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांना सहानुभूती दाखवण्याचा कोणताही प्रयत्न करत नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांना सहानुभूती दाखवण्याचा आरोप केला जात आहे. यावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांनी सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असं स्पष्ट केलं आहे. “ज्यांनी जाणीवपूर्वक गुन्हा केला आहे त्यांना सहानुभूती दाखवणार नाही. सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. माझ्या मनात असं काहीही नाही,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

“आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहेत, कोणत्या गुन्ह्यामध्ये जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील. अजून खातेवाटपाबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी कुणाला पाठिशी घालतोय असा प्रश्नच उद्भवत नाही. गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये. सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचे आहेत,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- संभाजी भिंडेची बाजू घेतल्याचा आरोप; जयंत पाटील म्हणाले…

जे प्रकल्प सुरू आहे ते प्रकल्प बंद करणार नाही
“आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे. जे प्रकल्प सुरू आहे ते प्रकल्प बंद करणार नाही, पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेतले जातील,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे
“शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही अशी आमची वृत्ती नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ,” असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

“आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, त्यामुळे मदत देण्यासाठी समान धोरण राबवू. आम्ही पक्ष बघून निर्णय घेणार नाही. ज्याला आवश्यक असेल त्याला आढावा घेऊन मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करणे आमचे प्राधान्य राहिल,” असंही जयंत पाटील म्हणाले.