सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा मागास असणाऱ्यांना आरक्षण दिले पाहिजे. परंतु, आरक्षणाने समाजाची प्रगती होते हे खरे नाही. आजवर ज्या समाजाने जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतला, त्या समाजाची प्रगती झाली नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावरुन नितीन गडकरी यांच्यावर टीका केली असून तुम्हाला पाच हजार वर्ष अघोषित आरक्षण होतं असं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून नितीन गडकरींवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “साहेब, तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होतं तेव्हा आम्ही शाळेच्याच नाही, तर गावकुसाच्या सुद्धा बाहेर होतो. तुमच्या पिढ्यानपिढ्या हजारो वर्षे शिकत होत्या, तेव्हा आमचे पूर्वज मैला वाहत होते किंवा रस्त्याच्या कडेला ढोरं धूत होते”.

गडकरींनी काय म्हटलं होतं ?

अखिल भारतीय माळी समाजाच्या महामेळाव्यात नितीन गडकरी बोलत होते. “मी जात मानत नाही. मनुष्य जातीने नव्हे, तर गुणाने मोठा होतो असे मी मानतो. पक्षाची उमेदवारी मागताना जेव्हा कर्तृत्वात उमेदवार कमी पडतो, तेव्हा जातीचे कार्ड पुढे केले जाते. जॉर्ज फर्नाडिस यांची कोणती जात होती, इंदिरा गांधी जात घेऊन आल्या नव्हत्या. गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले ते जातीमुळे नव्हे. मी पक्षाचा अध्यक्ष असताना लोक म्हणायचे, महिलांना आरक्षण मिळायला हवे. मी लगेच त्यांना विचारत असे, इंदिरा गांधी यांना कोणते आरक्षण मिळाले? कित्येक वर्षे इंदिराजींनी राज्य केले, लोकप्रिय झाल्या. महिला म्हणून त्या पंतप्रधान झाल्या नव्हत्या. वसुंधरा राजे, सुषमा स्वराज यांना कुठे आरक्षण मिळाले? तेव्हा आरक्षण मिळायला हवे, पण ते समाजातील शोषित, पीडित, दलित, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा मागास असलेल्यांना. आरक्षणाने समाजाची प्रगती होईल, असे कोणाला वाटत असेल तर तर ते खरे नाही,” असे ते म्हणाले.

‘मोदींनी कधी जात सांगितली नाही’

पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करताना गडकरी म्हणाले की, “चांगले काम केले तर लोकांना मत मागायला जावे लागत नाही, लोक स्वत: मत देतात. मोदी कधी जात सांगत नाहीत. परंतु, काही लोक मोठय़ा पदावर गेल्यावर जात सांगत असतात”.