करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं यासाठीदेखील राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रकारांसाठी विनंती केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, “आज आपल्या एका पत्रकार मित्राचे करोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती”.

ANI च्या पत्रकाराचं निधन
एएनआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्रात कडक निर्बंध
करोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी घेतला. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: लॉकडाउनच लागू केला. मात्र, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा देण्यात आली आहे.

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टाळेबंदी की कठोर निर्बंध यावर बरेच दिवस खल सुरू होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली होती. रविवारी दुपारी झालेल्या तातडीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षांचा अनुभव लक्षात घेता लॉकडाउन लागू करण्यात आलेली नसला तरी सरकारने लागू केलेले कठोर निर्बंध पाहता लॉकडाउनची दुसरी आवृत्तीच मानली जाते. हे सारे निर्बंध ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लागू के लेल्या मार्गदर्शक तत्वात स्पष्ट केले आहे. हे सारे निर्बंध सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून अमलात येतील.