राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मंगळवारी रात्री महाबळेश्वरवरुन परतत असताना एका अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले. रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका तरुणाला अजित पवार यांनी स्वतःच्या गाडीमधून रुग्णालयापर्यंत नेले. अजित पवारांनी दाखवलेल्या या माणूसकीचे आणि प्रसंगावधानाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास महाबळेश्वर-वाई- सातारा रस्त्यावर संतोष बजरंग जाधव हा तरुण दुचाकीवरुन जात होता. यादरम्यान रानडुकराने अचानक धडक दिल्याने जाधव दुचाकीवरुन पडला. जाधव हा बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडला होता. याच दरम्यान त्याच मार्गावरुन अजित पवार महाबळेश्वरमधील एक विवाह सोहळा आटपून परतत होते. रस्त्यावर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे अजित पवारांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ताफा थांबवला. पक्षाचे कार्यकर्ते रविराज तावरे लाखे आणि स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्या मदतीने त्या जखमी तरुणाला स्वतःच्या गाडीत बसवले आणि त्याला सातारा येथील रुग्णालयापर्यंत नेले.

अजित पवार यावरच थांबले नाही. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर चर्चा केली आणि जखमींवरील उपचारात कोणतीही कमी पड़ू देऊ नका, असेही सांगितले. अजित पवारांनी त्यांच्या स्वीय सहायकांना तरुणावर उपचार झाल्याखेरीज रुग्णालयातून जाऊ नका, अशा सूचना दिल्या आणि अजित पवार मार्गस्थ झाले.