सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय चुकीचा आणि लोकशाहीला घातक आहे. भाजप सरकार उद्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेतून निवडतील, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. सरपंच थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा होईल अशी भीतीदेखील पवारांनी व्यक्त केली आहे.

निवडून आलेले सदस्यच सरंपच कोण होणार हे ठरवू शकत होते. आता मात्र हा पारंपारिक निर्णय बदलण्यात आला असून सरपंच निवडण्याचा अधिकार जनतेला असणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयावरुन अजित पवार यांनी सोमवारी सांगलीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सरकारवर टीका केली. पवार म्हणाले, सरकार लोकशीहीची हत्या करत असून यातून घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होत आहे. सदस्य एका पक्षाचे आणि सरपंच दुसऱ्या पक्षाचे असे चित्र दिसू शकते. त्यामुळे विकासाचा खेळखंडोबा होईल असे पवार यांनी म्हटले आहे. उद्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेतून निवडतील असे सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. सरकारने हेकेखोर वृत्ती सोडायला पाहिजे. आम्ही या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती सरकारला करु असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

देशात स्वयंघोषित गोरक्षकांनी निष्पाप नागरिकांची हत्या केल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडले होते . या घटनांचा दाखला देत पवार म्हणाले, धर्माच्या नावाखाली गुंडगिरी करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. सरकार धर्माच्या नावावर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुनही पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असली तरी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. कर्जमाफीसाठी भरमसाट निकष लावलेत ही कसली कर्जमाफी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जोपर्यंत गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा संघर्ष सुरु ठेवणार. शेतकऱ्यांसह सामान्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हे प्रश्न तुम्ही मांडावेत असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपने मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण कुठे आहेत १५ लाख रुपये? मूळ प्रश्न सोडून लोकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारमधील लोक करत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.