राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून ८ जागांवर अद्याप चर्चा सुरु असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीने पुण्यातील जागा काँग्रेसला सोडल्याची बातमी सोशल मीडियासह काही वृत्तवाहिन्यांवर झळकली असली त्या चर्चेला काहीच अर्थ नाही. अद्याप पुण्याच्या जागेसंदर्भात निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात अजित पवार एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आघाडीबाबत ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असून  ४० जागांवर एकमत झाले असून लवकरच उर्वरित आठ जागांचा तिढाही संपुष्टात येईल, असे त्यांनी सांगितले.

शुक्रवारपासून काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याची जागा काँग्रेसला सोडली अशी चर्चा सुरू आहे. याबाबतही अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. सोशल मीडियावरील ही चर्चा आणि बातम्यांमध्ये तथ्य नाही. पुण्याच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील जागा वाटपा बाबत चर्चा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.