महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. व्यवस्थित कसे चालेल हे पाहिले पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहे. परंतु आमच्याबद्दल काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे. पण अशा गोष्टीकडे लक्ष देवू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अल्पसंख्याक सेलची बैठक आज, गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीच्यावेळी आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या बैठकीवेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी अनेक अफवा आणि चर्चेंना पुर्णविराम दिला. यावेळी ते म्हणाले की, आमच्याबद्दल काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे. त्या गोष्टीकडे लक्ष देवू नका. सरकार चालवताना अनेक अडीअडचणी आहेत.मात्र तरीही आपल्या विभागाला कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला दिला.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.