या सरकारने सध्या नवीन टून काढलीय, शेतकऱ्यांच्या खर्चावर दुप्पट हमीभाव देतो सांगत आहेत. आहो दीडपटीचा पत्ता नाही आणि दुप्पट देण्याच्या कसल्या घोषणा करता… कशाला जनतेला गाजरं दाखवता अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला सज्जड दम भरला.

मेहकर येथील जाहीर सभेत पवार यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही सत्तेसाठी हपापलेले नाही. सत्ता येत असते जात असते..आम्ही वचनपूर्ती करणारे आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले .

शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिले जाते. ७१ हजार कोटीची कर्जमाफी साहेबांनी करुन दाखवली आहे. दुष्काळ भागातील फळबागा, भाज्या या पिकांना हेक्टरी ५० हजार आणि ऊस पिकवतो त्यांना १ लाख हेक्टरी द्या अशी मागणी आम्ही केली होती परंतु एक रुपयाही सरकारने दिलेला नाही.

हे भाजपा सरकार बेरोजगारी वाढवतेय.. तुमच्या नोकर्‍या घालवतंय… आधारभूत किंमत देत नाहीय… कापसाला दर नाही… तांदुळ, तूरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही, त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी विचारणाही जनतेला केली.

आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार आहे. मग आरक्षण मागणार्‍या समाजांना अद्याप न्याय का देत नाही, असा जाबही पवार यांनी सरकारला विचारला.

विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील किती प्रकल्प या सरकारने पूर्ण केले आहेत असा सवाल त्यांनी केला. सर्व पक्षांना बरोबर घेणार आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षालाही व इतर पक्षांना बरोबर घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होवू नये यासाठी हा प्रयत्न करत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

आता या शिवसेनेला राम मंदिर बांधण्याचे का आठवले. साडेचार वर्षात का सुचलं नाही. अहो जो मुलगा स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधू शकला नाही तो काय राममंदिर बांधणार आहे असा टोला लगावतानाच निवडणुका जवळ आल्यावर यांना राममंदिराचा मुद्दा घेवून वातावरण अशांत करण्याचे काम केले जात आहे असा आरोपही केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा बुलढाणा येथील वरकटबकाल येथे झाली तर दुसरी सभा मेहकर येथे पार पडली.