News Flash

परिचारकांचे विधान भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचे लक्षण- अजित पवार

अजित पवारांची मुख्यमंत्र्यांसह भाजपवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

सोलापूरचे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. ‘सत्ता भारतीय जनता पक्ष्याच्या डोक्यात भिनली आहे की भाजपला सत्तेची नशा चढली हे कळायला मार्ग नाही’, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी प्रशांत परिचारक आणि भाजपचा समाचार घेतला.

‘तुम्हाला आम्हाला सुरक्षितपणे जगता यावे, यासाठी जवान सीमेवर जीवाची बाजी लावतात. शत्रू सैन्याने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देत असतात. आपल्या सैनिकांबद्दल सव्वाशे कोटी जनतेला अभिमान आहे. प्रशांत परिचारक यांनी मात्र सैनिकांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल केलेले विधान हे भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या मावळ्यांचा आणि महाराष्ट्राच्या शौर्याच्या परंपरेचा परिचारक यांनी अपमान केला आहे. प्रशांत परिचारक यांचे वक्तव्य लाजिरवाणे, संतापजनक आणि अक्षम्य आहे,’ असे म्हणत अजित पवारांनी परिचारक आणि भाजपवर जोरदार टीका केली.

‘परिचारक यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे भाजपच्या पापाचा घडा भरला आहे. जनता आता भाजपला अधिक सहन करू शकत नाही. भाजपला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागेल. फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे १५ आरोप झाले. मात्र मुख्यमंत्र्यांना फक्त खडसेंचा काटा काढायचा होता. त्यामुळेच खडसेंना बाजूला करण्यात आले आणि इतरांना क्लीन चिट देण्यात आली’, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2017 8:09 pm

Web Title: ncp leader ajit pawar slams prashant paricharak over his controversial statement on indian soldiers
Next Stories
1 शिवजयंती निमित्त जळगावात भव्य शोभा यात्रा
2 बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार परिचारकांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल
3 सोलापुरात राष्ट्रवादी-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, माजी उपमहापौर जखमी
Just Now!
X