निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का ?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. हनुमानाची आज ‘जात’ काढली जात आहे, पण देवांच्या जाती कशाला काढता, असा सवालही त्यांनी भाजपाला विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा शुक्रवारी खेड येथे पार पडली. यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागली. आज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावूक करायचे हाच उद्योग सुरु आहे. आज जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का? नवीन शहरे करा. यातून काय साध्य केले जात आहे असा सवाल त्यांनी विचारला. निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलीस शुटिंग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का? कोणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही परंतू मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे, हा भाजपचा डाव असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

जाहीर सभेच्या अगोदर खेड शहरात बैलगाडीतून अजितदादा पवार, सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी हाकण्याचे काम विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. सभेत आमदार संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. तर आमदार भास्करराव जाधव यांनी भाजप-शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले.