राज्याच्या उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार रविवारी सोशल मीडियावर सक्रीय झालेले आहेत. शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केलेल्या सर्व भाजपा नेत्यांचे अजित पवार यांनी आभार मानले आहेत. अजित पवारांनी स्वगृही परतावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एका बाजूला प्रयत्न करत असताना, अजित पवारांनी एक सूचक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आणला आहे.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे.

याचसोबत अजित पवारांनी आपल्याला मिळालेल्या पाठींब्याबद्दल सर्वांचे आभार मानत, थोडा संयम राखण्याचंही आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना आणि पाठीराख्यांना केलेलं आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच हा सर्वोच्च न्यायालयात गेलेला असून सर्वोच्च न्यायालय सोमवारी सकाळी साडे दहावाजता निकाल देणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.