डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी घराघरांमध्ये उत्साहात साजरी झाली. यानिमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोंविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी इतर मान्यवरांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटवरून सवाल उपस्थित केला आहे. ‘अप्रत्यक्षपणे संविधानाला श्रद्धांजली वाहण्याची ही पूर्वतयारी तर नसेल ना?,’ अशी शंका मिटकरी यांनी उपस्थित केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि बबिता फोगट यांनी ट्विट करून बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये काय झाली चूक?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी एक चूक काढली आहे. या मान्यवरांनी जयंतीनिमित्त बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यावरूनच त्यांनी ‘अप्रत्यक्षपणे संविधानाला श्रद्धांजली वाहण्याची ही पूर्वतयारी तर नसेल ना? असा शंकावजा सवाल उपस्थित केला आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली, असं ट्विट राष्ट्रपतींनी केलं होतं. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त सर्व देशवासियांच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली असं ट्विट पंतप्रधानांनी केलं होतं.