सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे. आता पेट्रोलचेही नाव बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. खेड येथील सभेत छगन भुजबळ म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहासाचा तज्ज्ञ शक्तीकांत दास आणला आहे. इथे इतिहास लिहायचा आहे का? इथे देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची आहे. अर्थव्यवस्थेची अक्षरश: वाट लावली आहे असा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत परंतु वायफाय देण्यासाठी या सरकारकडे कोट्यवधी रुपये आहेत. आता मला सांगा तुम्हाला वायफाय हवा की, भाकरी हवी असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

या सभेत धनंजय मुंडे यांनी देखील टीका केली. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाऱ्या भाजप सरकारला घरी बसवण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे यांनी रामदास कदम यांना ‘दाम’ दास कदम अशी उपमा देखील दिली.