एकेकाळी शिवसेनासोडून शरद पवारांसोबत गेलेले छगन भुजबळ पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतणार आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. छगन भुजबळ हे उद्या एक सप्टेंबरला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील असे वृत्त न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिले आहे.

राज्यामध्ये छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा जाळं उभं केलं आहे. त्यामुळे शिवसेना प्रवेशाच्यावेळी मोठया प्रमाणावर कार्यकर्ते त्यांच्यासोबत असू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा नाशिकमध्ये आली. तेव्हा छगन भुजबळ त्यांच्यासोबत नव्हते. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेने आणखी जोर पकडला. नाशिक हा काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला होता. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही.

छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील शिवसैनिक मातोश्रीवरही आले होते. छगन भुजबळ यांच्या राजकारणाची सुरुवात ६० च्या दशकात शिवसेनेतून झाली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. २५ वर्ष शिवसेनेत असताना शाखा प्रमुखपदापासून मुंबईचे महापौर, आमदार अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. १९९१ साली शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. तिथेही त्यांनी उपमुख्यमंत्रीपदासह विविध पदे भूषवली. आता ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी दाट शक्यता आहे.