पवार साहेबांवर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना सात जन्म घ्यावे लागतील तरीही ती पूर्ण होणार नाही, पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील, असं टोला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजाप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हाणला आहे. दोन दिवसांपुर्वी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पीएचडी करायची असल्याचं खोचकपणे म्हटले होते.

सामाजिक न्याय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धनजंय मुंडे यांनी शनिवारी पहिल्यांदाच पुणे येथे बार्टी संस्थेस भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी भाजपावर टीका केली. मुंडे म्हणाले, भाजपा सत्तेशिवाय राहू शकत नाही हे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे मध्यावधी निवडमुकीची जी अफवा भाजपा पसरवतेय त्याला काहीच अर्थ नाही. महापोर्टल बंद करण्याचा निर्णय शासन घेत आहे. त्याला पर्यायी यंत्रणा देत आहोत.

बार्टीमार्फत अनुसूचित जातींतील वंचित घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांचा सखोल आढावा यावेळी मुंडे यांनी घेतला तसेच बार्टी प्रशासनाला योग्य सुचना केल्या. नागपूर औरंगाबाद येथे एमपीएससी तसेच युपीएससी कोचिंग सेंटर सुरू करण्याबाबत, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत या बैठकीत विचार झाला. तर आयबीपीएस स्पर्धा पूर्वप्रशिक्षणाच्या दिव्यांग लाभार्थ्यांकरीता आरक्षण ४ टक्क्यावरून वाढवून ५ टक्के करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या. ऊसतोड कामगारांची लोकसंख्या निश्चित करण्याकरीता महाराष्ट्र व कर्नाटकातील संबंधित सहकारी व खासगी साखर कारखान्यांशी संपर्क साधून नोंदणी यंत्रणा बार्टीने उभारावी. तसेच बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना अधिकृत दाखले देण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली.

बार्टीच्या योजनांचा लाभ समाजातील मोजक्या क्लास वर्गाला नाही तर शेवटच्या माणसालाही आणि मास वर्गालाही झाला पाहिजे असे काम येत्या काळात केले जाईल. तसेच बार्टीला वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारा ब्रँड म्हणून मोठे केले जाईल, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते –

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपाही देशावरची आपत्ती आहे असा केला होता. त्याबाबत विचारलं असता, “शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण ते ५० वर्षे राजकारणात आहे तरीही त्यांचा पक्ष १० पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय? एकाचवेळी ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांचे म्हणणे कसे काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे.