राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या निर्धार परिवर्तनाच्या जाहीर सभेत बोलताना भाजपावर आणि पंकजा मुंडेंवर नाव न घेता जोरदार टीका केली. आमदारकी, खासदारकी मंत्रीपद घरात आहे त्यामुळे बीड जिल्हयातील जनतेच्या जीवनात काय क्रांती झाली ? असा सवाल त्यांनी केला. बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मंजुरांचा जिल्हा अशी आहे.

अजूनही ७८ सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. ते पूर्ण झाले असते ऊस तोड मंजुरांची संख्या कमी झाली असती पण पालकमंत्र्यांना ऐवढे सुद्धा समजत नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली. मस्तवाल सत्तेचा समारोप इथेच होणार असे ते म्हणाले. भाजपाच्या दबंग खासदाराचं वय काय ? असा सवाल करत त्यांनी प्रीतम मुंडेंवक निशाणा साधला.

सर्व धर्म विवाहसोहळयाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केल्याचे ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या रेल्वे रुळावरील फोटो सेशनवरुन त्यांनी टीका केली. हे फोटो पाहून मला अजय देवगणचा फुल और कांटे सिनेमा आठवला असे ते म्हणाले. २०१९ ला बीड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा खासदारच निवडून येणार. राष्ट्रवादीला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी फक्त ८० हजार मतांची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.