X
X

अजून किती नीच पातळी गाठणार; धनंजय मुंडेंचा भाजपावर हल्लाबोल

शरद पवारांची सुरक्षा काढल्यानंतर त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता सुरक्षा काढली. अजून किती नीच पातळी गाठणार? असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली असून सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी या निर्णयावरून भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटरवरून आपला रोष व्यक्त केला. “ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली… किती नीच पातळी गाठणार? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे… केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध!” अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते. मात्र २० जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा काढण्याआधी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती शरद पवारांच्या दिल्लीमधील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थान ‘सहा जनपथ’ येथे दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेवरील ताण तसंच आंदोलनं लक्षात घेता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्याची कल्पना संबंधित व्यक्तीला देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

24
Just Now!
X