देशात विकास तर जन्मला नाही मात्र मंदी आली असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान वाशिम या ठिकाणी बोलताना त्यांनी ही टीका केली. केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता देऊनही विकासाचा उतरता आलेख जनतेला दाखवणाऱ्या भाजपा सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच ही परिस्थिती बदलायची असेल तर शिवस्वराज्य स्थापन करण्याचे आवाहान त्यांनी उपस्थित जनतेला केले.

पुलवामा हत्याकांड झाले तेव्हा मोदींनी शहीद जवानांच्या नावावर मते मागितली. देशातील तरुणांनीही ‘मोदी है तो मुमकीन है’ असं म्हणत प्रतिसाद दिला. मात्र आज तरुणांना रोजगार नाही, उद्योग बंद होत आहेत, तरुणांचे लग्न होत नाही आताही तुम्ही म्हणाल का, मोदी है तो मुमकीन है? असा प्रश्न करत त्यांनी तरूणाईला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली.

सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. अनेक शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित ठेवले आहे. सोयाबीनच्या पिकाला जास्त पिकविमा मिळत असेल तर पिकविमा कंपन्या सोयाबीनचे पिकच त्यातून वगळतात. शेतकऱ्याचं लेकरू मंत्रिमंडळात नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचे राज्य आणण्याचे आश्वासन दिले. शिवस्वराज्य यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री अनिल देशमुख , खासदार अमोल कोल्हे, आमदार ख्वाजा बेग, प्रकाश गजभिये , अमोल मिटकरी, प्रकाश बालबुद्धे, शेख मेहबुब , वसंतराव घुईखेडकर, क्रांती धोटे आदी उपस्थित होते.