राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आश्वासन पूर्ण करण्यासाठी अनुभव लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देश चालवण्याचा अनुभव नाही. आयुष्यात त्यांनी कधी घरातला किराणा तरी आणला आहे का, व्यवहार केला आहे का, यांना संसार चालवण्याचा अनुभवच नाही तर सरकार चालवतीलच कसं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा काढण्यात येत आहे. शिराळा येथे ही यात्रा आल्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी आंदोलन केले. तत्कालीन केंद्र सरकारविरोधात जनता नाराज होती. याचा फायदा भाजपाने घेतला. भाजपाने मोदी यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले. गुजरात मॉडेल प्रोजेक्ट केले. पण मोठी आश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला.

इस्लामपूर येथे झालेल्या सभेतही त्यांनी मोदींवर टीका केली. जनता जागरूक राहिली तर लोक देशाच्या चौकीदाराची पुन्हा नेमणूक करणार नाही. जनतेत इतका रोष आहे की, आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना २०१९ नंतर कोणी ओळखणारही नाही. भाजपाने युवकांचा अपमान केला आहे. हा युवक आता हेच सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, या भागात एक मंत्री आहेत, मुद्दाम अंगावर येत आहेत. कोणाच्या जिवावर ? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिवावर, संस्था चालवायची अक्कल नाही, भ्रष्टाचार करतात, असा टोला लगावला. इस्लामपूर येथील सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना उत्साह आल्याचे दिसून आले.