शिवसेना आता शिवसेना राहिली नसून ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रिपदासाठी भाजपासमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे, अशी टीका करत वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते. मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लगावला. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे हल्लाबोल यात्रेत त्यांनी भाजपावरही आक्रमक शैलीत हल्ला केला.

तत्पूर्वी, उंब्रज येथील सभेतही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. २०१४ च्या काळात देशभरातील तरुणाई दीड-दीड फुट उड्या मारत ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा देत होती. त्यांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. आता मोदी तरुणांना म्हणतात भजी तळा. पंतप्रधान मोदींना याचा हिशोब द्यावा लागेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात केंद्र व राज्य सरकारविरोधात हल्लाबोल यात्रा काढण्यात येत आहे. आता ही यात्रा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पक्षाच्या वतीने सातारा जिल्हा ढवळून काढण्यात येत आहे. पाटण येथील सभेत आमदार जयंत पाटील यांनीही सरकारचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार लोकांना पचत नाही. बहुजन समाजासाठी हे सरकार मारक आहे हे आता लोकांना कळत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही अपयशी ठरले आहेत. लोकांनी नवीन म्हण तयार केली आहे, एकही भूल कमल का फूल, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, हल्लाबोल यात्रेच्या आठव्या दिवसाची सुरुवात आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रिती संगम या स्मृतिस्थळास अभिवादन करुन करण्यात आली.