राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्या नात्यात आता अंतर पडले आहे. आता बहीण-भावाचा संबंधही राहिलेला नाही. पण ज्यावेळी आमच्यात सुरळित सुरू होते. त्यावेळी त्या मला ‘धनुदादा’ अशी हाक मारत. ही हाक माझ्यासाठी भावणारा विषय आहे. पण ही हाक आता मला ऐकायला मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पंकजा मुंडे या राजकारणात येण्याआधी माझे आणि त्यांचे जे नाते होते, ते मला आवडते. पण नंतर जे झाले ते व्हायला नको होते. ते झाले नसते तर आमच्यासारखे बहीण-भाऊ आम्हीच होतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले. त्याचबरोबर माझी आवडती ताई सुप्रियाताई आहेत, असेही त्यांनी म्हटले.

काकांबरोबरचे (गोपीनाथ मुंडे) नाते मी कधीच विसरु शकत नाही. पुढच्या जन्मीही मला तेच काका लाभावेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा आणि सूत गिरणी घोटाळ्यावरही भाष्य केले.

अजित पवार यांचे चिरंजीव आणि मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्याच भाषणामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पार्थ पवार हे पहिल्यांदाच भाषण करत होते. भाषण करता आले नाही म्हणजे ते समाजासाठी काही काम करू शकत नाही, असे होत नाही. त्यावेळी अजित पवार उपस्थित होते. मोठ्याप्रमाणात लोक समोर होते. त्या दबावामुळे कदाचित तसे झाले असेल. मी पण १९९५ मध्ये पहिल्यांदा भाषण केले होते. तेव्हा यापेक्षाही वाईट भाषण केले होते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.