राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी आग्रही मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी त्यांनी पंचनामे करण्याचा पाठपुरावा प्रशासनाकडे लावला आहे. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरूवातही झालेली नाही. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल, असं मुंडे यावेळी म्हणाले.

परतीच्या पावासाचा फटका ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने झटपट सूत्र हलवून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.