जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले. या कारखान्याचे संचालक राजाभाऊ फड यांनीउच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस, येथील जुने सव्र्हे नंबर २४, २५ आणि इतरही शासकीय जमीन आहे. ही जमीन बेळखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आलेली होती. मठाचे महंत रणजित व्यंका गिरी होते. ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित होऊ शकत नाही. मात्र, मठाधिपतींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाने ही जमीन संगनमताने स्वतच्या नावे नोंदवून घेतली तसेच ही जमीन आपली असल्याचे दावे दाखल करून स्वतच्या नावे हुकूम काढून घेतले. शासनाला याची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. ही सर्व जमीन नंतर धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्यांआधारे खरेदी केली आणि ती अकृषक (एन. ए.) केली. ही जमीन शासनाची असल्याने शासनाला अंधारात ठेवून फसवणूक करून तिची परस्पर विल्हेवाट लावली आणि तशा नोंदी करवून घेतल्या. ही शासनाची फसवणूक असल्याने कलम ४२० अन्वये तसेच शासनाच्या परवानगीविना बनावट कागदपत्रांआधारे जमीन हस्तांतरित करण्यात आल्याने या कृतीस लागू असणाऱ्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय दबावामुळे या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तक्रारदार राजाभाऊ फड यांनी उच्च न्यायालय खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. यात धनंजय मुंडे, त्यांची पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे आदी १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली होती.
गुट्टेप्रकरणात आवाज उठवल्यामुळे तक्रार- मुंडे
अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन कुणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकऱ्यांना व बँकांना ५४०० कोटी रुपयांना बुडवणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई असलेल्या राजाभाऊ फड यांच्याकडून राजकीय सूडबुध्दीने न्यायालयाची दिशाभूल करून आपल्या विरूद्ध खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2019 12:12 pm