News Flash

मंत्र्यांच्या मुलांनी शिष्यवृत्ती घेतलेली नरेंद्र मोदींना चालते का?: धनंजय मुंडे

मुख्यमंत्री कारवाई करणार की पुन्हा एकदा या घोटाळ्यातही क्लीन चीट देणार ?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (संग्रहित छायाचित्र)

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीला शासनाची शिष्यवृत्ती देण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सामान्य माणसाला गॅसचे अनुदान सोडायला लावणा-या भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या मुलांनी सरकारची शिष्यवृत्ती घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चालते का ? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणतात की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना दिली होती. प्रसारमाध्यमांमध्ये शिष्यवृत्तीचे वृत्त झळकल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने बडोलेंकडून माहिती मागवली आहे. जर बडोलेंनी आधीच कल्पना दिली होती मग आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती का मागवली जाते असा सवाल त्यांनी विचारला आहे. गरीब अनुसूचित जाती- जमातीच्या मुलांच्या हक्काची शिष्यवृत्ती लाटणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार की पुन्हा एकदा या घोटाळ्यातही क्लीन चीट देणार असा प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. राजकुमार बडोले यांनी पदाचा गैरवापर केला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजकुमार बडोले यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी मुलीची निवड निकषांनुसारच झाल्याचा दावा त्यांनी केला. जगातील सर्वोत्तम १०० विद्यापीठं असतील, तर उत्पन्नाची मर्यादा शिथिल करण्याचे निकष असल्याचे बडोलेंचे म्हणणे आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोलेला अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रॉफिजिक्स विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलीलाच या विभागाकडून शिष्यवृत्ती जाहीर झाल्याने बडोले अडचणीत आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2017 9:14 pm

Web Title: ncp leader dhananjay munde reaction on minister for social justice rajkumar badole daughter scholarship controversy
Next Stories
1 नांदेडची सार्वत्रिक तर पुणे महानगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर
2 फक्त मलाच का टार्गेट केले जाते? : खडसे
3 सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलीलाच शिष्यवृत्तीचा लाभ, सचिवांच्या मुलाचेही ‘कल्याण’
Just Now!
X