राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आदराने घेतलं जातं. तसंच पवार घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं घराणं आहे. अशात पवार घराण्यात सारं काही आलबेल नाही अशी चर्चा आता रंगली आहे. ‘ट्रेडिंग पावर’ या प्रियम गांधींच्या पुस्ताकातून हा दावा करण्यात आला आहे. पार्थ पवारांना डावललं जातंय आणि रोहित पवारांचं बळ वाढवलं जातं आहे असं या पुस्तकात म्हटलं गेलं आहे. या पुस्तकावरील एकंदरीत चर्चेवरून शरद पवार एवढेच कळाले का असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

“प्रियम गांधींना शरद पवार हे कसे कळले हेच मला माहित नाही. मी पुस्तक वाचलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. कधीही शरद पवार या काळात भाजपा सोबत किंवा त्यांच्या विचारधारेसोबत जातील असं आम्हाला वाटत नाही, यापूर्वीही वाटलं नाही आणि भविष्यातही वाटणार नाही,” असं धनंजय मुंडे म्हणाले.

पार्थ पवारांना हवं तसं पाठबळ नाही

पवार कुटुंबात वाद म्हणावेत असे नाहीत. पण पक्षावर कुणाची कमांड राहिली पाहिजे या मुद्द्यावरुन पवार कुटुंबात सारं आलेबल आहे असंही म्हणता येणार नाही. पार्थ पवारांना ज्या पद्धतीने पाठबळ मिळायला हवं होतं तसं मिळालेलं नाही. त्यामुळे पवार कुटुंबात वाद नसले तरीही सारं काही आलबेल आहे असंच अधोरेखित होतं आहे असं प्रियम गांधी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं.

अजित पवार नाराज असल्याचा दावा

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या एका नेत्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार तुमच्यासोबत सत्ता स्थापन करू शकतात. त्यांचा शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध आहे, असं फडणवीसांना सांगितलं. त्यासाठी या नेत्याने शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादा इच्छुक नाहीत, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. त्यामुळेही अजितदादा नाराज असल्याचं या नेत्याने फडणवीस यांना सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.