शरद पवार यांच्या वाढदिवशी धनंजय मुंडे भावूकराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. दरम्यान, सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “१९९३ साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपात मृत्यूने थैमान घातलेले असताना त्या मृत्यूला देखील जगण्याची उमेद दिलेला, माणसातला देव मी शरद पवार यांच्या रूपाने पाहिला,” असे भावनिक उद्गार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेल्या ‘महाशरद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ‘ई-बार्टी’ या मोबाईल अॅपचे शरद पवार यांच्या हस्ते व्हर्च्युअली अनावरण करत लोकार्पण करण्यात आले.
“शरद पवार यांच्या बद्दल बोलताना दिलेल्या ७ मिनिटांच्या वेळेत त्यांचं कर्तृत्व मांडणं ही अशक्य बाब असून, त्यांचं नेतृत्व हिमालयाईतकं उंच, अढळ आहे. शरद पवार यांचे विचार हे एक चालते बोलते विद्यापीठ आहेत. तसेच माझ्यासाठी ते एक शक्तीपीठ आहेत,” असंही मुंडे यावेळी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 2:57 pm