हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरूणीच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही स्त्रियांवर अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या इशारावजा दम दिला आहे.

गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेनं सकाळी अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं जात आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही असा सज्जड दम अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला ट्विटरवरून दिला आहे.

हिंगणघाटमधील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे यानं पेट्रोल टाकून पेटवून दिलं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.

आणखी वाचा – हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा संघर्ष थांबला; उपचारादरम्यान मृत्यू

हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे. क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

आणखी वाचा – हा मृत्यू नव्हे, हत्याच; हिंगणघाट जळीतकांडावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनीही व्यक्त केला संताप –
या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. “अतिशय दुःखद..! हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.
“जलदगतीनं हा खटला चालवण्यात यावा, जेणेकरून तातडीनं न्याय मिळतो हा संदेश जायला हवा. त्याचबरोबर आरोपीलाही जरब बसली पाहिजे. ही घटना अत्यंत दु:खदायक असून, तिच्या कुटंबियांच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे. अवघ्या २१-२२ वर्षांची ती तरुणी होती. आरोपींनं क्रूर कृत्य केलं आहे,” असंही सुळे म्हणाल्या.

आणखी वाचा – “माझ्यासमोर आरोपीला जिवंत जाळा”; पीडितेच्या वडिलांची मागणी

“माझ्या मुलीला जसा त्रास झाला तसा त्रास आरोपीला झाला पाहिजे,” अशी भावना मुलीच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. “त्याला जिवंत जाळलं पाहिजे. त्याला जनतेसमोर आणलं पाहिजे. इतकचं मी यावेळी सांगू शकतो,” असंही पडितेच्या वडिलांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात बोलताना, “लवकरात लवकर या खटल्याचा निर्णय लावा, नाहीतर आरोपीला आमच्या स्वाधीन करा,” अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

कोण आहे आरोपी?

आरोपीचे नाव विकेश नगराळे असं आहे. आरोपीचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते. घटनेनंतर सहा तासांनी आरोपी नगराळे यास टाकळघाट येथून अटक करण्यात आली होती. सध्या आरोपीला न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.