राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते अशी ओळख असलेले गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ३० जुलै रोजी गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश नाईक यांच्या प्रवेशासंबंधी मात्र कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

नवी मुंबईत आता सगळीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपात गेले तर नवी मुंबई महापालिकेतली राष्ट्रवादीची सत्ता जाईल. गणेश नाईक हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी मात्र या विषयावर मौन सोडलेलं नाही. राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनी बैठकीमध्ये एकमुखाने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आता या निर्णयामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.

नवी मुंबईत राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपात जाणार

ठाणे लोकसभा मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले. ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही आनंद परांजपे हे ४५ हजार मतांनी मागे होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत राहिलो तर आपले काही खरे नाही असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा गणेश नाईक काय भूमिका घेतात याकडे लागलं आहे.

दरम्यान गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे मुंबईतले नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर दोनच दिवसांनी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. त्यादेखील ३० जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.