“टाळी, थाळी वाजवून, दिवे लावून देशातील कोरोना जाण्याऐवजी उलट वाढला. देशाच्या पंतप्रधानांचा निर्णय म्हणून आपण जे जे केले, त्याने करोनावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आणि राज्य सरकारचा निषेध करणार्‍या भाजपाने करोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गुरूवारी शहरातील शुभमंगल कार्यालयात आयोजित पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकर चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड आणि काही अन्य मान्यवर उपस्थित होते.

आणखी वाचा- लॉकडाउनसंबंधी अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

“राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार संयमाने निर्णय घेऊन करोनावर नियंत्रण मिळवित आहे. मात्र सर्वसामान्यांची काळजी नसणारे विरोधक मंदिरे उघडा, शाळा उघडून गर्दी वाढवून कोरोना वाढविण्यावर भर देत आहेत. मात्र राज्य सरकार याकडे फारसे लक्ष न देता उपाययोजना करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहे,” असं पाटील म्हणाले.

आणखी वाचा- देशाच्या तुलनेत महाराष्ट्र करोना रुग्णांच्याबाबतीत ‘सेफ झोन’मध्ये- राजेश टोपे

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील उमेदवार सतीश चव्हाण यांनी मागील दोन्ही कार्यकाळात पदवीधरांचे प्रश्न मांडण्यात आघाडी घेतली आहे. महापरीक्षा पोर्टल बंद करणे, नीटचे परीक्षा केंद्र सुरू करणे, वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाचा ७०:३० चा फॉर्म्यूला रद्द करणे असो, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न असो, शिक्षक, प्राध्यापक व पदवीधरांचे प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडून आपली कामगिरी दाखवून दिली. तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठीही चव्हाण यांनी प्रयत्न केल्यामुळे ३० ते ४० टक्के अनुदान शाळांना मिळत आहे. त्यामुळे त्यांना मराठवाड्यातील पदवीधर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मोठ्या मताधिक्याने ते विजयी होणार असल्याचा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.