महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा. हातात काळं घेताना एकदा विचार करावा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

“हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा. आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना? असा विचारही जनतेने मनात आणावा अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

आणखी वाचा- राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज; रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपाने आज ‘माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करीत निदर्शने करतील, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. करोना मुकाबल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून ‘मातोश्री’ निवास स्थानाबाहेर पडावं, असा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लगावला होता.

आणखी वाचा- राज्य सरकार पूर्णपणे निष्क्रिय, एकही नवा पैसा खर्च करण्यास तयार नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबईत क्षमतेपेक्षा कमी चाचण्या का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबईत दररोज १० हजार करोना चाचण्यांची क्षमता असताना सध्या निम्म्याहून कमी म्हणजे चार—साडेचार इतक्याच चाचण्या करण्यात येत असून तरीही २२ टक्के रूग्णांना लागण झाल्याचे निष्पन्न होणे ही गंभीर परिस्थिती असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. तसंच मुंबईतील चाचण्या वाढविण्याची मागणी फडणवीस यांनी केली होती.