भाजपाचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळ्या काही लोक निघून गेले. मात्र चौकीदाराला ते सापडलेच नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. कन्नड येथील सभेत जयंत पाटील यांनी हा आरोप केला. पाच राज्यांमध्ये पराभव झाल्याने भाजपा सरकार सावध झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेला वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत. मात्र खोटी आश्वासने देणाऱ्या या पक्षाला जनता पुन्हा निवडून देणार नाही असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघे जण याच सरकारच्या काळात पीएनबी बँकेेला चुना लावून फरार झाले. त्याच अनुषंगाने जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

भाजपा सरकार या देशात विकास करण्यात अपयशी ठरले आहे. नोकर्‍या न देण्यात आणि आश्वासनांचे गाजरं दाखवण्यात यशस्वी झाले आहेत. इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आमच्या काळात पूर्ण होणार होते मात्र आमचे सरकार गेल्यावर गेल्या साडेचार वर्षात या स्मारकाची एक वीटही रचण्यात आलेली नाही असाही आरोप जयंत पाटील यांनी केला. आघाडीचा खासदार निवडून आणा. २० वर्षात जे काम झाले नाही ते काम आघाडीचा उमेदवार निवडून आल्यावर करु त्यासाठी कन्नडकरांनो साथ द्या असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. हे सरकार विविध आश्वासनं देऊन सत्तेत आलं. मात्र सत्ता मिळताच या सरकारला आश्वासनांचा विसर पडला असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.