उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सरकारच्या अस्थिरतेविषयीच्या चर्चांवर पडदा पडला होता. मात्र, एका आठवड्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. या चर्चांवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला चिमटा काढला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या चर्चांचे पेव फुटले. त्यावर मंगळवारी दिवसभर राजकीय खुलासे आणि आरोप झाले. दरम्यान, या चर्चांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला चिमटे काढत टीका केली आहे.

“पडणार, पडणार, पडणार… झाडावरून पिकलेले आंबे, सीजन आहे ना!!!
आपलेच आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून किती वेळा ओरडावे लागते, पडणार… पडणार… पडणार,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

राज्यातील अस्थिरतेविषयी काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सरकार स्थिर असून बैठकीच्या माध्यमातून कोणताही संकेत दिला जात नाही असं सांगितलं होतं. “राज्यपालांची भेट घेतली यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्यांनी दोन वेळा चहाचं निमंत्रण दिलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहण्यास आपण कटिबद्ध आहोत,” असंही त्यांनी सांगितलं. “महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. जर सध्याच्या परिस्थितीत आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तर जनता माफ करणार नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस उगाच उतावीळ होत असल्याचा टोलाही शरद पवार यांनी लगावला होता.