गेल्या २० दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराच जवळपास ९ रूपयांपर्यंत तर डिझेलच्या दराज ११ रूपयांपर्यंतची वाढ झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे. काही वर्षांपूर्वीच तुमचं हे ट्विट तुम्हाला आठवतंय का? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी अभिनेता अक्षय कुमार याचं जुन्या ट्विटवर रिप्लाय करत त्याला यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

“मला खात्री आहे की तुम्ही डिमेन्शियाच्या रुग्ण नाहीत. तुम्ही काही वर्षांपूर्वी केलेली काही ट्विट तुम्हाला लक्षात असतीलच. सध्या इंधनाच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. अशावेळी तुम्ही काय ट्विट कराल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन,” असं म्हणत त्यांनी स्मृती इराणी यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरुन त्यांच्यावर हल्लाबोल केला.

“पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली. सामान्य जनतेचं हे यूपीए सरकार आता काही खास इंधन कंपन्यांचं सरकार आहे,” असं ट्विट स्मृती इराणी यांनी ३ नोव्हेंबर २०११ रोजी केलं होतं. या ट्विटला आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. गुरूवारी आव्हाड यांनी अक्षय कुमार याच्यावर जुनया ट्विटवर रिप्लाय करत तू आता गाडी वापरण बंद केलंस की ट्विटर असा प्रश्न केला होता.