राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होणार असतानाच आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि भेटीचे कारण काय होते, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. जितेंद्र आव्हाड यांनी ही सदीच्छा भेट असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी सकाळी ‘मातोश्री’वर पोहोचले. आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.

ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाही आक्रमक झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीसह भाजपाही जोर लावत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादीत खलबतं झाल्याची चर्चा देखील रंगली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देतानाचे छायाचित्रही पोस्ट केले. या ट्विटमध्ये आव्हाड यांनी ही सदीच्छा भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.