राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसने वीजकपातीवरून ‘जवाब दो’च्या माध्यमातून हल्लाबोल केला असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यातील रडखलेल्या निर्णयांची यादी ट्विट करत आव्हाड यांनी सत्ता मिळाली खरी पण करून ठेवला गोंधळ अशी टिका सरकारवर केली आहे.

आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी अगदी वीजकपातीपासून ते तूर खरेदीपर्यंत अनेक विषयांचा संदर्भ देत राज्य सरकारला सुनावले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘कोळसा नाही म्हणून लोडशेडींग सुरु. बारदाण नाही म्हणून तुर खरेदी बंद. स्ट्रेचर नाही म्हणून पेशंट झोळीत. अहवाल नाही म्हणून आरक्षणाचा खोळंबा. बाजू नीट मांडली नाही म्हणून MPSC च्या ८०० निवडी रद्द. सत्ता मिळाली खरी पण करून ठेवला गोंधळ.’

याआधी आज सकाळीच राष्ट्रवादीने राज्य सरकारला वीजकापातीवरून सुनावले आहे. राज्यात रहिवासी भागात दोन ते ८ तास तर कृषीपंपांना दोन तास वीजकपात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारने महाराष्ट्र अंधःकारात नेऊन ठेवल्याचा आरोप केला आहे.

सोशल मिडियावर सुरु केलेल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आज राष्ट्रवादीच्या ट्विटवर अकाऊण्टवरून ट्विट केले आहे. ३८ वा प्रश्नाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपा सरकारच्या लोडशेडिंगमुक्त धोरणावर ताशेरे ओढले आहेत.

मात्र कालच महाराष्ट्र भाजपाने ट्विट करून राज्यातील वीजकापातीसंदर्भातील माहिती दिली होती. या ट्विटमध्ये, ‘सध्याच्या परिस्थितीत ऑक्टोबर हिटमुळे विजेची विक्रमी मागणी वाढली आहे. महावितरणने विविध उपाय केल्यामुळे सध्या फक्त ५०० मेगावाटचा तुटवडा आहे. त्यामुळे काही भागात ३-४ तास लोडशेडिंग आहे. कोळशाचा पुरवठा वाढत असून विजेचा तुटवडा लवकरच भरून निघेल.’ म्हटले होते.

मात्र आता आव्हाडांनी केलेल्या या आरोपांवर महाराष्ट्र भाजपाकडून काही उत्तर येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.