काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर आव्हाडांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, दोन महिन्यांनी त्यांनी आपली रक्त तपासणी केली. रक्त तपासणी अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सातत्यानं फिरतीवर असणाऱ्या अनेक व्यक्तींना करोनाचा संसर्ग होत असल्याच्या घटना समोर आल्या. यात माध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची चाचणीतून निष्पन्न झालं होतं. करोनाचं निदान झाल्यानंतर आव्हाड यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्यावरील उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. “गेल्या काही दिवसांपासून करोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईला यश आलेलं असून, मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढेही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,” अशी भावनाही त्यांनी करोनामुक्त झाल्यावर व्यक्त केली होती.