लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पासून दुरावलेले पक्षाचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहेत. मात्र, ही केवळ एक अनौपचारिक भेट होती. त्याला कसलेही राजकीय संदर्भ नाहीत, असे महाडिक यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

साखर उद्योगातील अडचणींबाबत साखर कारखानदार केंद्र व राज्य पातळीवर प्रयत्न करीत आहेत. गुरूवारी मुंबई येथे साखर कारखानदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही भेट होणार होती. हे शिष्टमंडळ तेथे पोहोचण्यापूर्वीच पवार हे दुसरीकडे गेल्याने शिष्टमंडळाची भेट होऊ शकली नाही.

दरम्यान, त्यावेळी याठिकाणी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असल्याचे समजल्याने धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेतली. साखर उद्योगातील परिस्थितीबाबत त्यांच्यात चर्चा झाली. मात्र याला कसलाही राजकीय संदर्भ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाज माध्यमात महाडिक पुन्हा राष्ट्रवादी कडे जाणार अशी चर्चा सुरू असली तरी त्यामध्ये कोणतही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट सुप्रिया सुळे आणि आपल्यामध्ये स्नेहपूर्ण संबंध असून या व्यक्तिगत कौटुंबिक नात्यातून त्यांच्याशी संवाद साधला, असेही ते म्हणाले.