“लोकशाही मार्गाने चालणार्‍या सरकारला सर्कस बोलणार्‍या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे हे ‘अनुभवाचे बोल’ आहेत,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्या टिकेला उत्तर देताना रिंगमास्टरच्या चाबूकने चालणाऱ्या सरकारने लोकशाही मार्गाने चालणार्‍या सरकारला ‘सर्कस’ बोलणे हास्यास्पद आहे, असं ते म्हणाले.

“महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरू आहे. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे आयएमसीआरने मुंबई मॉडेलची स्तुती केली आहे. मात्र, असे असताना केंद्रीयमंत्री राजनाथसिंह रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार असे वक्तव्य करत आहेत,” असेही मलिक म्हणाले.

काय म्हणाले राजनाथ सिंग ?

“महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगलं नाही,” असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं. शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे,” असंही ते म्हणाले.

“आम्ही करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. सहकार्य करतो आहोत. तरीही या सरकारला करोनाग्रस्तांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही ही बाब दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही. राजकारण समाजाच्या सेवेसाठी केली जाते. राजकारण हे स्वार्थासाठी केलं जात नाही,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.