८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा करुन देशाला पोखरून टाकण्याचे काम मोदी सरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. देशावर ४२ लाख कोटींचे कर्ज होते ते मोदी सरकारच्या काळात ८४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, असा दावा मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर टीका केली. देशावर ४२ लाख कोटींचे कर्ज होते ते आजमितीला ८४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे याचा अर्थ मोदी सरकारने साडेचार वर्षांत अक्षरशः कर्जाचा डोंगर कशापध्दतीने उभा केला आहे हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

नोटाबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे काही प्रश्न या देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण झाले. गेल्या साडे चार वर्षांमध्ये ३० – ४० लाख कोटीचे कर्ज वाढले तो पैसा गेला कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  ३० लाख कोटी रुपये उभे केले ते कशावर खर्च केले. देशावर कर्जाचा डोंगर उभा केलात तर त्यातून संरक्षणावर किती, देशातील रस्त्यावर किती खर्च केले याचा हिशोब मोदी सरकार देणार नाही. आज पानभरुन वृत्तपत्रात जाहिराती यायला लागल्या आहेत. एका वृत्तपत्रात दोन – तीन जाहिराती दिल्या गेल्या आहेत यावर लाखो कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

या देशात भाजपा कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करत आहे. प्रवासावर खर्च वाढला आहे. परदेशी वार्‍यांवर खर्च जास्त झाला आहे. कामांपेक्षा जास्त गाजावाजा करण्यात आला आहे. त्यामुळे साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल असेही पाटील यांनी म्हटले आहे.