सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. मनसेबाबत आमची स्पष्ट भूमिका आहे. आता मनसेबाबत काँग्रेसमध्येच दोन गट असून यात संजय निरुपम यांनी मनसेला विरोध दर्शवला आहे. तर मिलिंद देवरा यांच्या मते शिवसेनेपेक्षा मनसे चांगली आहे. आता महाआघाडीत मनसेला सामील करण्याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसच घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांच्यावर मोबाईल खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांनी हा आरोप केला. पत्रकार परिषदेदरम्यान नवाब मलिक यांना मनसेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर नवाब मलिक म्हणाले,  लोकसभा निवडणुकीत जागांसंदर्भात मनसेचा आग्रह नाही. आमची मनसेबाबती भूमिका आधीच स्पष्ट करण्यात आली आहे. आता काँग्रेसने याबाबत निर्णय घ्यायचा आहे. विशेष म्हणजे मनसेबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रात भाजपचा पराभव करण्याकरिता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून, मनसेनेही बरोबर यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी मांडले होते. मनसेला अधिकृतपणे आघाडीत घेतले वा मनसेने पाठिंबा दिला तरीही काँग्रेसवर हिंदीविरोधी शिक्का बसू शकतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या हिंदी भाषक पट्टय़ांत काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. मनसेला बरोबर घेतल्यास भाजप काँग्रेसच्या विरोधात हा मुद्दा तापविण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचा मनसेला विरोध असल्याचे समजते.