दोन महिन्यांपूर्वी मंत्री व सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या नेत्यांनी दुष्काळाच्या मागणीसाठी आता मात्र थेट रस्त्यावर उतरून आपले नेतृत्व मजबूत ठेवण्यास सुरुवात केली आहे. परळीत सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मोर्चा काढून पीकविमा मंजूर करण्याची, तर माजी मंत्री सुरेश धस, आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार बदामराव पंडित व काँग्रेसचे सुरेश नवले यांनी पीक पैसेवारी ५० टक्क्यांच्या पुढे गेल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाच विद्यमान आमदारांचा पराभव झाला. तब्बल १५ वष्रे सत्तेत मंत्री व आमदारकीत मश्गुल असलेले हे नेते पराभव होताच विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेले आहेत. मतदारसंघात आपला प्रभाव कायम राहावा, या साठी दुष्काळ, पैसेवारीच्या मागणीवरून हे नेते आता आक्रमक झाले आहेत. परळीतून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे यांनी सोमवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची आणि पीकविमा मंजूर करण्याची मागणी केली. मोंढय़ातून निघालेल्या मोर्चात गर्दी जमवून धनंजय मुंडे यांनी पराभवानंतरही आपण सक्रिय असल्याचे दाखवत आपले नेतृत्व पक्केकरण्याचा प्रयत्न केला.
माजी पालकमंत्री क्षीरसागर यांनी अल्प मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, त्यांनीही लोकांत जाऊन प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आभार मेळावे घेताना प्रशासनाने पैसेवारी ५० टक्क्यांपुढे जाऊ देऊ नये व सरकारने दुष्काळ जाहीर करून गुरांना चारा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. माजी मंत्री धस यांनीही आष्टीत पीक पैसेवारीबाबत आक्रमक होत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. माजी आमदार बदामराव पंडित व काँग्रेसचे माजी आमदार सुरेश नवले यांनीही पीक पैसेवारीबाबत सरकारला जाब विचारत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. नवनिर्वाचित आमदार मात्र मुंबईत विश्वासदर्शक ठरावासाठीच्या विशेष अधिवेशनात आहेत. दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी म्हणून देणारेच आता मागणारे झाल्याचे चित्र दिसत आहे.