News Flash

पंढरपूर पालखी सोहळ्याबद्दल रोहित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

संपूर्ण काळजी घेऊन हा सोहळा पार पाडता येईल का याचा विचार करावा असंही ते म्हणाले.

“पंढरपूरच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मी दरवर्षी भजन स्पर्धा व माझ्या कुटुंबासोबत बारामतीतून मार्गस्थ होणाऱ्या तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करत असतो. पण यंदा करोनाचं संकट असल्याने पालखी सोहळा होईल की नाही याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. याबाबत वारकरी संप्रदायातील अनेक मंडळींनी नियोजनाबाबत माझ्याशी फोनवर संपर्क साधून आपलं मत मांडलं. हा सोहळा व्हावा, असा त्यांचा आग्रह आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक निकष पाळून हा पालखी सोहळा पार पाडता येईल का, याबाबत विचार व्हायला हवा,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केलं. या वर्षी करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील पालखी रोहळ्याबाबत अनिश्चितता आहे. त्यावर रोहित पवार यांनी फेसबुकद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे.

“वारीची परंपरा ही जात, धर्म, पंथ, प्रांत, स्त्री-पुरुष, गरिब-श्रीमंत, लहान-मोठा अशा भेदभावाला दूर करत भक्ती, समता, एकात्मता, बंधुता जपत असते. त्यामुळे हा सोहळा व्हावा, असं मलाही वैयक्तिकरित्या मनापासून वाटतं. तसंच पालखीच्या तिथीपर्यंत लॉक डाऊनमध्येही बऱ्यापैकी शिथिलता आलेली असेल. त्यामुळे प्रतिबंधात्मक निकष पाळून हा पालखी सोहळा पार पाडता येईल का, याबाबत विचार व्हायला हवा,” असं रोहित पवार म्हणाले.

“राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या पंढरपूरात दाखल होत असतात. व्यवस्थापन शास्राच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशा प्रकारे या दिंड्या दरवर्षीच आपल्या शिस्तीचं दर्शन अवघ्या जगाला घडवत असतात. यंदा गावोगावच्या भाविकांनाही अशाच शिस्तीचं अधिक कठोर पालन करावं लागेल, किंबहुना कुणीही पालखीजवळ यायचं नाही, असाही नियम करता येईल. पालखी मार्गावरील गावकरीही गर्दी न करता त्यासाठी सहकार्य करतील, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- शरद पवारांवरील निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं चोख उत्तर, म्हणाले…

“प्रतिबंधात्मक उपायांमध्ये दिंड्यांना परवानगी न देता फक्त पालखी सोबत जास्तीत जास्त पाच ते सात वारकऱ्यांनाच परवानगी देणे, पालखी मुक्कामाचे दिवस कमी करणे, तसेच पंढरपूरला हॉट स्पॉट म्हणून घोषित करुन आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त आरोग्य चाचणी केलेले नोंदणीकृत वारकरी व पालखी सोहळ्याचे पदाधिकारी यांनाच प्रवेश दिला तर गर्दीही होणार नाही आणि शारीरिक अंतरही राखले जाईल अशी व्यवस्था करणं तसेच विठू माऊली ही अवघ्या चराचरात असल्याची भावना सर्व वारकरी संप्रदायात असल्यामुळे इतर वारकरी मंडळी घरीच विठ्ठलाचं दर्शन घेऊन या सोहळ्याला नक्कीच सहकार्य करतील असा मला विश्वास आहे,” असंही ते म्हणाले. अशा प्रकारे संपूर्ण काळजी घेऊन सोहळा पार पाडता येईल का, याचा सरकारने विचार करावा. यामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडित न होता अखंड सुरू राहील. पण याबाबत सरकार जो निर्णय घेईल तो योग्यच असेल असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 1:20 pm

Web Title: ncp leader rahit pawar speaks about ashadhi ekadashi palkhi tukaram maharaj pandharpur coronavirus jud 87
Next Stories
1 वर्धा : शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना प्रशासनातर्फे रेशन, किराणा वाटप
2 घर बसल्या पाहा शिर्डीच्या साईबाबांची LIVE आरती
3 “… तरीही म्हणतात साखर उद्योग वाचवा;” निलेश राणेंची शरद पवारांवर टीका
Just Now!
X