News Flash

मोहिते-टोपेंच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क!

मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक राजकारण करीत आहेत.

मोहिते-पाटील व राजेश टोपे

सोलापूर : राष्ट्रवादीपासून दुरावत भाजपशी जवळीक साधलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दर्शनाच्या निमित्ताने येथे येत बंद खोलीत चर्चा केली. मोहिते-पाटील यांनी सध्या थेट भाजपात प्रवेश केलेला नसला, तरी त्यांच्या संपर्कातूनच सध्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप-सेनेचा मार्ग पत्करला आहे. टोपे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर या दोघांची आज येथे झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त करण्यात आले.

विजयसिंह मोहिते-पाटील हे आज अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आले होते. योगायोगाने याचवेळी माजी मंत्री राजेश टोपे हे देखील सपत्नीक दर्शनासाठी आले होते.

स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व आरती झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांचा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी महावस्त्र देऊन सत्कार केला.

दर्शन,आरती आणि सत्कार आटोपल्यानंतर मोहिते-पाटील व टोपे यांच्यात देवस्थानाच्या कार्यालयात बंद खोलीत चर्चा झाली. त्या वेळी अन्य व्यक्ती उपस्थित नव्ह’ती.

लोकसभा निवडणुकांपाठोपाठ आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आयारामांची गर्दी होत आहे.

मोहिते-पाटील घराण्याने लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादीशी काडीमोड घेत भाजपशी घरोबा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक राजकारण करीत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पट्टय़ात त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर मोहिते-पाटील व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची अक्कलकोटमध्ये योगायोगाने भेट झाल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 2:56 am

Web Title: ncp leader rajesh tope meeting with vijaysinh mohite patil in close room zws 70
Next Stories
1 भाजपची स्थिती चांगली, काँग्रेसपुढे आव्हाने
2 गावाला रस्ता नसल्याने संसारमार्गात अडथळे
3 नेतृत्वाअभावी रायगडमध्ये काँग्रेसची वाट बिकट
Just Now!
X