लोकसत्ता ऑनलाइन, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुरता ढासळत चालला आहे. पक्षाचे नेते अजित पवार हे स्वतः पक्षाचे जिल्हा प्रभारी म्हणून काम करीत असूनही पक्षाच्या बालेकिल्ल्याला पडणारे खिंडार थोपविता येईना, अशी नेतृत्वाची केविलवाणी स्थिती झाली आहे. बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाट्यावर असून येत्या आठवडाभरात त्यांच्याकडून अधिकृत राजकीय निर्णय घोषित होणार आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क वाढल्यामुळे राष्ट्रवादीत संशयकल्लोळ वाढला आहे.

याच पार्श्वभूमीवर करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी दिगंबर बागल-कोलते यांनी आज करमाळ्यात समर्थकांची बैठक घेऊन उद्या मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उद्या मुंबईत मातोश्रीवर रश्मी बागल उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन बांधून घेणार आहेत. यानिमित्ताने बोलताना रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून निष्ठावंतांना डावलून स्वार्थी आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या मंडळींनाच मोठे केले जात असल्याचा आरोप केला आहे.

रश्मी बागल यांनी राकरमाळ्यात मागील विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी अत्यल्प म्हणजे अवघ्या २४९ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या पराभवात संजय शिंदे यांचा वाटा मोठा होता. कारण शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी आणून लक्षणीय मते मिळविली होती.