अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी “एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला,” असं म्हणत सरकारवर टीकेचा बाण सोडला होता. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी शेलार यांना टोला लगावला आहे.

“आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहिल. पण बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं,” असं म्हणत रोहित पवार यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकेचा बाण सोडला.

आणखी वाचा- बबड्याच्या हट्टापायी दहा लाख विद्यार्थ्यांना त्रास दिला; शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

काय म्हणाले होते शेलार?

“एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार, ऐकतो कोण?, सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला,” असं म्हणत शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. “कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ज्ञांची मते घुडकावली, यूजीसीला जुमानलं नाही, मंत्रिमंडळात चर्चा केली नाही, विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरलं, अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले, यातून काय साध्य केले?,” असा सवालही शेलार यांनी केला होता.